ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील शीतला माता मंदिराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर), रात्री उशिरा धानाने भरलेला एक ट्रक पोलिसांचा बॅरिकेड तोडून उतारावरून घसरला आणि रस्त्यावरील भाविकांना अक्षरशः चिरडत गेला. यात १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर ३३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तर या अपघातानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक रस्त्यावर थांबवण्यात आला होता, परंतु तो बॅरिकेड्स तोडून पुढे गेला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उतारावरून वेगाने खाली आला आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीवर व प्रवेशद्वारावर जाऊन आदळला. या अपघातात रस्त्यावरून चाललेले भाविक वाहनाखाली चिरडले गेले.
लरामपूरमध्ये कारने उडवले; तिघांचा मृत्यू
दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या भीषण अपघातानंतर आता उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्येही असाच एक अपघात झाला आहे. दुर्गा पूजा मंडपाबाहेर पडद्यावर व्हिडीओ पाहत असलेल्या भाविकांना एका कारने उडवलं. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. बलरामपूर जिल्ह्यातील चिरगहियान बेलहा गावात ही घटना घडली आहे. शनिवारी ग्रामीण आणि भाविक एका दुर्गा पूजा मंडपाबाहेर उभे राहून व्हिडीओ पाहत होते. याच दरम्यान सिद्धार्थनगरच्या दिशेने जाणारी एका भरधाव आणि अनियंत्रित कारने तेथे उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडत निघून गेली.
हृदयद्रावक! बस-कारचा भीषण अपघात; माजलगाव-तेलगाव महामार्गावर ५ जणांचा जागीच मृत्यू
माजलगाव : माजलगाव - खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी फाट्या जवळ रविवारी (दि. १८ ऑक्टोबर २०२६) सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि हुंडाई कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत हे सर्वजण माजलगाव शहर व परिसरातीलच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण माजलगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून बस (एमएच २०-२४४०) आणि हुंडाई कार (एमएच २६-४२१०) जात असताना शिंदेवाडी फाट्यादरम्यान हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची नावे आणि नेमक्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.